दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अल्टिमेटम; अन्यथा पालिकेत येऊन जाब विचारण्याचा इशारा
अमळनेर : शहरातील गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पाणीपुरवठा करा आणि दोन दिवसांत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला.
गेल्या २२ दिवसांपासून शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, अनेक नागरिकांनी याबाबत आमदार अनिल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या.
या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या. केवळ आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करू नका, तर प्रत्यक्ष त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
“दोन दिवसांत संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळाले नाही, तर मी स्वतः पालिकेत येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार,” असा स्पष्ट इशाराही आमदार अनिल पाटील यांनी दिला.
आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्याचे समजते.
आता दोन दिवसांच्या अल्टिमेटमनंतर अमळनेर शहराचा पाणीप्रश्न प्रत्यक्षात सुटतो का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भिम गर्जना 24 न्यूज
