मुंगसे, दापोरी तांदलवाडी ठेक्यांवर प्रशासनाचे दुर्लक्ष

अमळनेर : तालुक्यात सुरू असलेल्या वाळू ठेक्यांमधून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य व मर्यादेबाहेर वाळू उपसा होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक स्तरावरून करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मुंगसे, दापोरी, चोपडा तालुक्यातील तांदलवाडी यांचा समावेश असून शासनाने निश्चित केलेल्या अटी व पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे नदीपात्रांचे नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील एकूण पाचही वाळू ठेक्यांवर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असून संबंधित ठेकेदारांकडून कोणतेही नियम पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून भविष्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधितांनी मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनात सर्व वाळू ठेक्यांची तात्काळ चौकशी करून मर्यादेबाहेर उपसा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित ठेके तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
