केले नगर वळणावरील जीवघेणा खड्डा नागरिकांसाठी ठरत आहे संकट
अमळनेर : अमळनेर–गलवाडे मार्गावरील केले नगर वळणाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. दिवसेंदिवस खड्ड्यांची तीव्रता वाढत असताना संबंधित प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यावसायिक आणि नागरिक प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
भिम गर्जना 24 चा सवाल
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, नागरिकांचा जीव धोक्यात आहे, तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही… मग प्रशासन नेमके कोणत्या घटनेची वाट पाहत आहे? एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का?
विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र नागरिकांना सुरक्षित रस्ते देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र अमळनेर–गलवाडे मार्गावर स्पष्ट दिसत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन केले नगर वळणावरील खड्डे बुजवावेत आणि संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
– भिम गर्जना 24 न्यूज
सत्य | समता | न्याय
आपला मीडिया, आपला आवाज

