“आदिवासी समाजाचा कोणत्याही धर्म किंवा जाती प्रवर्गात समावेश होऊ शकत नाही” – एसी भारत सरकार
अमळनेर : आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाची स्वतंत्र ओळख मान्य करण्यात यावी आणि कोणत्याही धर्म अथवा जाती प्रवर्गात त्यांचा समावेश करू नये, अशी मागणी एसी भारत सरकारच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे केली.
यावेळी एसी भारत सरकारचे 25 ते 30 कार्यकर्ते तहसील कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, आदिवासी समाज हा कोणत्याही धर्माशी अथवा जाती प्रवर्गाशी संबंधित नसून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे जनगणनेदरम्यान आदिवासी समाजाचा समावेश कोणत्या धर्मात अथवा कोणत्या वर्गवारीत करण्यात येणार आहे, याबाबत त्यांनी प्रशासनाला प्रश्न उपस्थित केला.
कार्यकर्त्यांनी असा दावा केला की, आदिवासी हे या भूमीचे मूळ निवासी असून त्यांची ओळख स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी. तसेच जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांनी आवश्यक शासकीय कागदपत्रे व अधिकृत ओळखपत्रे सादर केल्याशिवाय आदिवासी समाजाची माहिती देण्यात येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी एसी मगन अनुबाई बुधा (दहिवद), एसी गोकुळ कलाबाई ताराचंद फुला (साळवे, ता. धरणगाव), एसी गणेश बानुबाई त्र्यंबक (अमळनेर), एसी हिरालाल लिलाबाई युवराज (गिरड, ता. भडगाव) यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नायब तहसीलदार सी. यू. पाटील व सुषमा घोंगडे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित आयोग व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील माहिती कळविण्याचे आश्वासन दिले.
भिम गर्जना 24 चा मुद्दा
जनगणना हा केवळ आकडेवारीचा विषय नसून ओळख, प्रतिनिधित्व आणि अधिकारांशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. आदिवासी समाजाच्या स्वतंत्र ओळखीबाबत मांडण्यात आलेल्या मागण्यांवर शासन आणि संबंधित यंत्रणांनी सविस्तर संवाद साधून स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक असल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त होत आहे.
– टीम भिम गर्जना 24 न्यूज

