अमळनेरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा

 जनतेच्या प्रश्नांवर ठोस उत्तर मिळणार का?

अमळनेर  : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राज्यभर विधानसभा निहाय “शिवसंवाद दौरा” राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी अमळनेर येथे होत आहे.

अमळनेर येथील हॉटेल मिड टाऊन येथे दुपारी २.३० वाजता अमळनेर, चोपडा आणि जळगाव ग्रामीण या तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त शिवसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना संपर्कमंत्री भाऊसाहेब चौधरी, विभागीय सचिव आनंद परांजपे, माजी खासदार दिलीप लांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेकडून या दौऱ्यात संघटनात्मक आढावा, आगामी निवडणुकांची तयारी आणि विकासकामांबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अमळनेर, चोपडा आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. खराब रस्ते, पाणीपुरवठा, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य सुविधा आणि विविध विकासकामांचा रखडलेला वेग याबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे या शिवसंवाद दौऱ्यात केवळ पक्षीय संवाद होणार की जनतेच्या प्रश्नांनाही प्राधान्य दिले जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विकासकामांच्या घोषणांबरोबरच त्यांच्या अंमलबजावणीचा हिशोबही जनतेसमोर मांडला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी केले आहे.

– टीम भिम गर्जना 24 न्यूज

सत्य | समता | न्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!