गावठी दारूविरोधात उत्पादन शुल्क विभागाचा धडक कारवाईचा बडगा

२० गुन्हे दाखल, १५ आरोपी ताब्यात

अमळनेर : पुणे येथे गावठी दारूमुळे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर राज्यभर अवैध मद्यव्यवसायाविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध दारू माफियांना मोठा दणका दिला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ जून ते ४ जून २०२६ या कालावधीत चोपडा, अमळनेर, धरणगाव आणि पारोळा तालुक्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले असून १५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

धाडसत्रादरम्यान ७,४१० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू, २०० लिटर ताडी आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹५ लाख ६० हजार ७९५ इतकी असल्याची माहिती विभागाने दिली.
चिखलोत शिवार, शेळावे शिवार, गांधली, कलाली, सावखेडा, हिंगोली बुद्रुक, सुटकार आणि अडावद परिसरात ही कारवाई करण्यात आली. अवैध दारू निर्मिती व विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना आणि निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असताना प्रशासनाने अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुणे दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असले तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध दारूचे अड्डे अजूनही सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केवळ धाडसत्र न राबवता संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या मोहिमेत निरीक्षक अ. कै. सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे, एन. पी. खपके, आर. के. फुसे तसेच डी. एन. पाटील, एस. एस. पाटील, भूषण परदेशी आणि नितीन पाटील यांनी सहभाग घेतला.

टीम भिम गर्जना 24 न्यूज

“सत्य | समता | न्याय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!