प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
अमळनेर : तालुक्यातील वाळू उत्खनन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे तापी नदीपात्रात वाळू ठेकेदारांकडून झालेल्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे निर्माण झालेले खड्डे बुजवले जात असल्याची माहिती समोर येत असताना, दुसरीकडे बोरी नदी परिसरात मात्र रात्रीचे पथक तैनात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, तापी नदीवरील काही वाळू ठेक्यांवर नियमबाह्य पद्धतीने बोटी व यंत्रसामग्रीचा वापर करून उत्खनन झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली होती. त्यानंतर संबंधित ठेके बंद करण्यात आले. मात्र आता नदीपात्रात तयार झालेले मोठमोठे खड्डे बुजवले जात असल्याची चर्चा सुरू असून, यामुळे उत्खननाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, तापी नदीतील या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासनाचे लक्ष बोरी नदीकडे वळलेले दिसत आहे. ज्या ठिकाणी सध्या विशेष हालचाल नसल्याचे सांगितले जाते, त्या ठिकाणी रात्रीचे पथक तैनात करण्यामागील नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“दुखत कुठं आणि उपचार कुठं?” अशी भावना आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, तापी नदीतील खड्ड्यांची तातडीने पाहणी करून त्यामागील सत्य बाहेर आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भिम गर्जना 24 न्यूज प्रशासनालाही काही थेट प्रश्न विचारत आहे –
1) तापी नदीतील खड्डे नेमके कोणाच्या आदेशाने बुजवले जात आहेत?
2) या कामाची महसूल विभागाकडे अधिकृत नोंद आहे का?
3) जर उत्खननात अनियमितता झाली असेल तर पुरावे जतन करण्याऐवजी ते नष्ट का केले जात आहेत?
4) बोरी नदीवर रात्रीचे पथक आणि तापीकडे दुर्लक्ष का?
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. कारण नदीपात्राचे नुकसान, पर्यावरणाचा प्रश्न आणि महसूलाचा विषय हा केवळ प्रशासनाचा नसून जनतेच्या हक्काचा मुद्दा आहे.
भिम गर्जना 24 न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून असून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहील.
