सीडबॉल, वृक्षारोपण आणि स्वच्छतेचा संदेश
अमळनेर : वाढते प्रदूषण, घटते हरित क्षेत्र आणि बदलते हवामान या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेरमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमळनेर नगरपरिषद आणि महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान 2026 व माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
उपक्रमांची सुरुवात इंदिरा गांधी भवन येथे आयोजित सीडबॉल कार्यशाळेने झाली. या कार्यशाळेत नागरिक व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे 1,000 सीडबॉल तयार केले. भविष्यात वृक्षसंवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यानंतर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओंकार नगर येथे “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 अंतर्गत नागरिकांना स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच माहितीपत्रकांचे वाटप करून नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
दरम्यान, नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरातील विविध प्रभागांतील मुकादमांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन अधिनियमातील नियम, जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेवक, आरोग्य सभापती, स्वच्छता विभागाचे अधिकारी-कर्मचारी, महिला हाउसिंग ट्रस्टच्या पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिम गर्जना 24 चा मुद्दा
पर्यावरण दिन साजरा करणे महत्त्वाचे असले तरी त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे वर्षभर पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करणे. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती, जलसंवर्धन आणि स्वच्छता यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यासच अशा उपक्रमांचे खरे सार्थक होईल.
