१२ दिवस पाण्याविना झामी चौक; नागरिकांचे हाल, प्रशासन झोपेत!

माजी नगरसेवक विक्रांत पाटील आक्रमक; अखेर प्रशासनाला जाग

अमळनेर : शहरातील झामी चौक परिसरातील नागरिकांना तब्बल १२ दिवस पाण्याविना राहण्याची वेळ आली आणि नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग मात्र हातावर हात धरून बसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागले, पण प्रशासनाला याची दखल घ्यायला तब्बल दोन आठवडे लागल्याचा आरोप होत आहे.

माहितीनुसार, नगर परिषदेकडून सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान मुख्य पाणीपुरवठा लाईनवरील व्हॉल्व्ह माती व बांधकाम साहित्याखाली गाडला गेला. परिणामी झामी चौक परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. मात्र इतकी गंभीर समस्या निर्माण होऊनही संबंधित विभागाकडून तातडीची उपाययोजना करण्यात आली नाही.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागल्याने आर्थिक भुर्दंडही बसला.

दरम्यान, माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतरच प्रशासनाने गाडलेला व्हॉल्व्ह शोधून दुरुस्तीचे काम सुरू केल्याची चर्चा परिसरात आहे.

अखेर सुमारे १५ व्या दिवशी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पाणी सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी एक साधा व्हॉल्व्ह शोधण्यासाठी प्रशासनाला दोन आठवडे लागणे हे नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण असल्याची टीका होत आहे.

जनतेचा सवाल…

पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना १२ दिवस नागरिकांना पाण्याविना ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का?

विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या दैनंदिन जीवनाचा बळी देणाऱ्या निष्काळजीपणावर कारवाई होणार का?

झामी चौक परिसरातील नागरिक आता या प्रश्नांची उत्तरे मागत असून भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!