वारंवार तक्रारी करूनही प्रश्न कायम; तातडीने उपाययोजनांची मागणी
अमळनेर : शहरातील पैलाड जलकुंभ परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असून संतप्त नागरिकांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. जलकुंभ परिसरात राहूनही नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या पाईपलाईनमुळे पाण्याचा दाब कमी होत असून अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक वेळी १० ते १२ घरांना पाणीटंचाईचा फटका बसत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निवेदनात जुन्या पाईपलाईनची संपूर्ण तपासणी करून आवश्यक ठिकाणी नवीन लाईन टाकावी, तसेच नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जलकुंभ आहे, पण त्या लोकांना पाणी नाही!
पैलाड परिसरातील नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे — “जलकुंभ आमच्या दारात, पण पाणी मात्र आमच्या घरात नाही!” नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्त्वाची असलेली पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यात नगरपरिषद वारंवार अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई अधिक तीव्र होत असताना प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या निवेदनावर परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही पाठविण्यात आली आहे.
भिम गर्जना 24 चा सवाल
शहरातील नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी देणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असताना, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण का होत नाही? पाणीटंचाईची तक्रार आल्यानंतरच प्रशासन जागे होणार की यावर दीर्घकालीन उपाययोजना केली जाणार?
